फुलंब्री - पाचोरा महामार्ग रुंदीकरणात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Foto
भरपाई न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

फुलंब्री, (प्रतिनिधी): फुलंब्री पाचोरा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) रुंदीकरणाच्या कामामुळे चिंचोली नकीब परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त पिके, फळबाग, सागवानाची झाडे तसेच शेतीतील पाईपलाईनचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकरी रावसाहेब प्रभत जंगले यांनी दिला आहे.

रावसाहेब जंगले यांच्या म्हणण्यानुसार, मौजे बाबरा येथील गट क्रमांक ४९ मधील त्यांच्या शेतीतून महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. या कामादरम्यान गव्हाचे पीक, जनावरांचे शेड, सागवानाची १२ झाडे, चिंचेची २,
आंब्याची ८, मोसंबीची २ झाडे यांचे नुकसान झाले. तसेच शेतातील सुमारे १५० ते २०० खेड्यांची (फुटांची) पाईपलाईन जेसीबीच्या कामामुळे पूर्णपणे दाबली व चेपली गेली असून, गट क्रमांक १ ते २३ पर्यंत टाकण्यात आलेली पाईपलाईनही निकामी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

याबाबत अद्याप कोणताही पंचनामा न करता अथवा नुकसानभरपाई न देता काम सुरू ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकरणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. 

 घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानभरपाई मिळेपर्यंत काम थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार अनुराधा चव्हाण यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर खासदार कल्याण काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून नुकसानभरपाईची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे रावसाहेब जंगले यांनी सांगितले.

 नुकसानभरपाईचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा रावसाहेब जंगले यांनी दिला असून, प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.